
धाराशिव, 13 जून (हिं.स.)।
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), धाराशिव येथे १५ जून २०२६ रोजी “शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात नामांकित टाटा मोटर्स,पिंपरी (पुणे) कंपनीचे प्रतिनिधी सोमेश्वर सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
या भरती मेळाव्यात मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, टूल अँड डाय मेकर,वेल्डर, शीट मेटल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आदी ट्रेडमधील प्रशिक्षणार्थींनी बायोडाट्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप कालावधीत प्रतिमाह १९ हजार ८५० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रतिमाह ३ हजार ५०० रुपये इतकी अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनाकडून दिली जाणार आहे.
जुलै २०२६ मध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रशिक्षणार्थींनीही या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी आयटीआय किंवा एमसीव्हीसी उत्तीर्ण झालेल्या आणि अद्याप शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) न मिळालेल्या प्रशिक्षणार्थींनाही ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा भरती मेळावा १५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व बायोडाटा घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.एस.बिरादार यांनी केले आहे.
टाटा मोटर्ससारख्या अग्रगण्य कंपनीत शिकाऊ उमेदवारीची संधी उपलब्ध होत असल्याने धाराशिवसह परिसरातील आयटीआय व एमसीव्हीसी प्रशिक्षणार्थींसाठी हा भरती मेळावा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis