मोहरम,नीट परीक्षा व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात २६ जूनपर्यंत जमाव-शस्त्रबंदी
धाराशिव, 13 जून (हिं.स.)। मोहरम सण,विविध स्पर्धा परीक्षा, जिल्ह्यातील आंदोलनात्मक घडामोडी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ जून २०२६ या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.महाराष्ट्र पोलीस अधि
मोहरम,नीट परीक्षा व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात २६ जूनपर्यंत जमाव-शस्त्रबंदी


धाराशिव, 13 जून (हिं.स.)।

मोहरम सण,विविध स्पर्धा परीक्षा, जिल्ह्यातील आंदोलनात्मक घडामोडी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ जून २०२६ या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी जारी केला आहे.

पोलीस अधीक्षक,धाराशिव यांनी सादर केलेल्या अहवालानुसार १७ जून ते २६ जून दरम्यान मोहरम सण साजरा होणार असून या काळात सवारी, पंजे,डोले आणि ताबूत स्थापना तसेच मिरवणुका व रॅलींचे आयोजन केले जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

याशिवाय १४ जून रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ तर २१ जून रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाभरातील विद्यार्थी या परीक्षांसाठी उपस्थित राहणार असून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान,जिल्ह्यात विविध समाजांकडून महापुरुषांचे आणि महामानवांचे अनधिकृत पुतळे उभारण्याच्या घटनांमुळे काही ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. पुतळ्यांच्या जागा,चौक आणि स्थानांबाबत दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरोधातही नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे मोर्चे, रास्तारोको,बंद आणि आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून धरणे,मोर्चे, उपोषण,बंद,निदर्शने,तालाठोको आणि रास्तारोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रम अचानक आयोजित होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून १३ जून २०२६ रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते २६ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

या कालावधीत शस्त्रे,तलवारी, बंदुका,सोटे,काठ्या,लाठ्या, स्फोटके,दाहक पदार्थ,दगड किंवा इतर घातक साहित्य जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच प्रक्षोभक भाषणे, विडंबनात्मक कृती,आक्षेपार्ह घोषणा,संविधानविरोधी किंवा सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृती,प्रक्षोभक गाणी,वाद्य वाजविणे आणि असभ्य वर्तन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय एकत्र येऊ शकणार नाही.कोणताही मोर्चा,मिरवणूक किंवा सभा घेण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वलिखित परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

मात्र अंत्ययात्रा,धार्मिक विधी,विवाह समारंभ,सामाजिक सण,शासकीय कार्यक्रम,शासकीय कर्मचारी तसेच सिनेमागृहे आणि रंगमंच यांसारख्या सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी स्वाक्षरी व शिक्क्यानिशी हा आदेश जारी केला असून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande