शेअर बाजारातील कोट्यवधींच्या नुकसानीनंतर बार्शीत चार जणांच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मुख्याध्यापक, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकस
fgdf


सोलापूर, 13 जून (हिं.स.)।

बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मुख्याध्यापक, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

योगेश बाळासाहेब पाटील (वय ३९), पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३७), मुलगा अथर्व (वय ११) आणि शिवांश (वय ९) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुलांना विष दिल्यानंतर योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घरातून काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून, त्यांचे परीक्षण सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक तपासात योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारांमधून सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आर्थिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांनी कोणतेही निश्चित कारण अद्याप जाहीर केलेले नाही.

या दुर्दैवी घटनेमुळे वैराग आणि बार्शी परिसरात शोककळा पसरली असून, एका सुशिक्षित कुटुंबाचा झालेला अंत सर्वांनाच अस्वस्थ करून गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande