
रत्नागिरी, 13 जून (हिं.स.) । लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनमध्ये जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
बैठकीस फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजकुमार जैन यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, उद्योजक व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती, वाशिष्ठी नदीवरील बंधारा उभारणी, स्ट्रीटलाइटची व्यवस्था, नियमित वीज व पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता व सुरक्षितता, तसेच ईएसआयसी सेवा दवाखान्यातील अपुऱ्या सुविधांबाबत चर्चा झाली. याशिवाय ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, गाणेखडपोली पुलाचे काम, पेट्रोल व डिझेल बॅरल अथवा पिंपामधून उपलब्ध न होण्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी, लघुउद्योजकांसाठी पर्यायी उपाययोजना तसेच मैत्री पोर्टलच्या कार्यक्षमतेसंदर्भातील प्रश्नही मांडण्यात आले.
प्रशांत पटवर्धन यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यावर जिल्हाधिकारी श्री. जिंदाल यांनी उपस्थित विभागीय अधिकाऱ्यांकडून संबंधित कामांचा आढावा घेतला व सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच उद्योजकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
बैठकीस लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे संचालक शिरीष चौधरी, रवींद्र कदम, मंदार अडिवरेकर, राजेश तिवारी, दत्तात्रय जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा जिल्हा उद्योग मित्र श्री. अ. आजगेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी सौ. वंदना करमाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त अमित जाधव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी मोरेश्वर धवल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक एन. वेले, खेडच्या उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली पाटील, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे, नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, शशी देसाई, पाटील, दापोली उद्योजक व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष अरुण नरवणकर, प्रवीण कलाल होते.
याशिवाय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ईएसआयसी विभागाचे अधिकारी, विविध उद्योगांचे प्रतिनिधी व व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व उद्योग क्षेत्रामध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी