नाशिक - पहिल्या टप्प्यात ३७.५२ लाख लसमात्रांचे वाटप सुरू - पशुसंवर्धन आयुक्त
लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी,राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग; नाशिक, 13 जून (हिं.स.)। राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून (Lumpy Skin Disease - LSD) सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी आवश्यक गो
Distribution of 37.52 lakh


लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी,राज्यात गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला वेग;

नाशिक, 13 जून (हिं.स.)। राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून (Lumpy Skin Disease - LSD) सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांच्या उत्पादनाला वेग देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे नियोजनबद्ध वाटप सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातील लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेमार्फत आवश्यक गोटपॉक्स लसींचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन लसमात्रांचे नियोजनबद्ध वाटप करण्यात येत आहे

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. लसींची वाहतूक व साठवणूक करताना शीतसाखळी व्यवस्थापनात कोणताही खंड पडू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध उत्पादन देणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षमतेच्या पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. मोहिमेच्या प्रगतीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित अहवाल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना लसीकरण मोहिमेचा विहित नमुन्यातील दैनंदिन एकत्रित अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी दिल्या आहेत.

गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला होता, त्या तालुक्यांमध्ये प्राधान्यक्रमाने लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यापक मोहिमेत जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि पशुसेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

*पशुधनाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य*

लंपी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील गोधनाचे संरक्षण करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी बांधवांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी गोटपॉक्स लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीही विभागास सक्रिय सहभागातून सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande