गिरीश महाजन यांच्या “खडसे किस्सा” वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल
राजकारण तापण्याची शक्यता
गिरीश महाजन यांच्या “खडसे किस्सा” वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल


जळगाव, 13 जून (हिं.स.) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाशी संबंधित एक जुना किस्सा सांगितल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

महायुतीच्या बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एका प्रसंगी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी “अमर रहे” अशा घोषणा दिल्या होत्या. या उल्लेखामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा किस्सा सांगताना काही उपस्थितांनी त्याचे चित्रीकरण न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, जळगावातील राजकीय वातावरणात या घटनेमुळे पुन्हा एकदा तणाव आणि चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande