
नाशिक, 13 जून (हिं.स.) : सन 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आदिवासी विकास विभागाने विशेष तयारी केली असून राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये यंदाचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उपक्रम सोमवार, दि. 15 जूनपासून राबविण्यात येणार आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या सुमारे 500 शासकीय आणि 556 अनुदानित आश्रमशाळा असून त्यामध्ये जवळपास पावणेतीन लाख विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळा केवळ सुरू होणार नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस आनंददायी आणि प्रेरणादायी करण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रवेशोत्सवाच्या दिवशी शाळांमध्ये वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शालेय वातावरणाशी सकारात्मक जोड देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी शालेय व्यवस्थापन समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, एनजीओ, सहकारी संस्था, बचत गट आणि ज्येष्ठ नागरिक संघांचे सहकार्य घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांना दप्तर, शूज, शालेय पुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका आणि स्टेशनरी यांसारखे शैक्षणिक साहित्यही वितरित केले जाणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, “आश्रमशाळा दर्जेदार शिक्षणाचा गाभा आहेत. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल ओढ निर्माण करणे हा उद्देश आहे. हा उपक्रम पुढे एक उत्सवाचे स्वरूप घेईल आणि त्यामध्ये अधिकारी, शिक्षक तसेच स्थानिक प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असेल.”
-------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV