एफडीएच्या धडक कारवाईचा गूळ उद्योगाला फटका; पुण्यात आवक ८० टनांवरून २० टनांवर
पुणे, 13 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळविरोधी धडक कारवायांचा परिणाम आता पुण्यातील गूळ बाजारावरही दिसून येत आहे. नियमबाह्य उत्पादन आणि भेसळयुक्त गुळाविरोधातील मोहिमेमुळे दौंड आणि सां
fda


पुणे, 13 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळविरोधी धडक कारवायांचा परिणाम आता पुण्यातील गूळ बाजारावरही दिसून येत आहे. नियमबाह्य उत्पादन आणि भेसळयुक्त गुळाविरोधातील मोहिमेमुळे दौंड आणि सांगली परिसरातील शेकडो गुऱ्हाळांनी उत्पादन बंद केल्याने पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

एरवी दररोज ७० ते ८० टन गुळाची आवक होणाऱ्या बाजारात सध्या केवळ २० टन गूळ दाखल होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्याच्या गूळ बाजारात प्रामुख्याने सांगली जिल्हा आणि दौंड तालुक्यातून गुळाची आवक होते. मात्र, उसाचे वाढलेले दर, गुळाला मिळणारा तुलनेने कमी बाजारभाव आणि एफडीएकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

गुळाच्या उत्पादनात रंग आणि साखरेचा वापर केल्याच्या संशयावरून एफडीएने अनेक गुऱ्हाळांवर धाडी टाकल्या आहेत. या कारवाईनंतर केडगावसह दौंड परिसरातील जवळपास ४०० गुऱ्हाळांनी उत्पादन बंद केल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी गुळाची उत्पादन साखळी विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम बाजारातील आवक आणि व्यापारावर होत आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, भेसळविरोधी कारवाई आवश्यक असली तरी नियमांचे पालन करणाऱ्या उत्पादकांना दिलासा मिळावा आणि उद्योग सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने संतुलित भूमिका घ्यावी. अन्यथा गुळाच्या उपलब्धतेवर आणि बाजारभावावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande