नागपूरला ‘हरित शहर’ बनविण्याचा संकल्प; 25 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य – नितीन गडकरी
केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा मांडले लेखा-जोखा नागपूर, 13 जून (हिं.स.) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्याला ‘हरित शहर’ म्हणून विकसित करण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संक
पत्रकार परिषदेला संबोधित करताना नितीन गडकरी


केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा मांडले लेखा-जोखा

नागपूर, 13 जून (हिं.स.) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्याला ‘हरित शहर’ म्हणून विकसित करण्यासाठी 25 लाख वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, नागपूर येथील दूरसंवेदन केंद्राच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या सहकार्याने राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले आहे, त्यांची माहिती संकलित करून त्यांचा गौरव करण्यात येईल.

केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 58 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. आयुष्मान भारत योजनेचे 60 कोटी लाभार्थी असून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 11 कोटी गॅस जोडण्या वितरित करण्यात आल्या आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य मिळत आहे.

रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात मुद्रा योजनेअंतर्गत 57 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून त्याचा लाभ लघुउद्योजक आणि पथविक्रेत्यांना झाला आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत 1.6 लाख स्टार्टअप्स आणि 118 युनिकॉर्न निर्माण झाले असून स्किल इंडिया मिशनअंतर्गत 5 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूरच्या विकासकामांचा लेखा-जोखा मांडतांना गडकरी यांनी शहरातील प्रमुख बाजारपेठांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये कॉटन मार्केट पुनर्विकास प्रकल्प (टप्पा 1 व 2), इतवारी बाजार, दही बाजार, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, कमाल चौक कमर्शियल कॉम्प्लेक्स, बुधवार बाजार, महाल पुनर्विकास प्रकल्प आणि सक्करदरा बुधवार बाजार पुनर्विकास प्रकल्पांचा समावेश आहे.

याशिवाय दाभा येथील ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर, सोक्ता भवन पुनर्विकास, मोर भवन आणि गणेशपेठ बसस्थानक पुनर्विकास यांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही राबविण्यात येत आहेत. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून तिसऱ्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये ऑक्सिजन पार्क, बर्ड पार्क, एम्स, आयआयएम, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, ट्रिपल आयटी, बुटीबोरी येथील कर्मचारी राज्य विमा रुग्णालय, बुद्धिस्ट सर्किट योजना, दीक्षाभूमी पुनर्विकास प्रकल्प, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया केंद्र आणि मदर डेअरी प्रकल्प यांसारख्या विविध विकासकामांची माहितीही त्यांनी दिली. रस्ते विकासासोबतच रोजगारनिर्मितीवर भर देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार देशभरात 1600 प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.

त्यापैकी 24 केंद्रे कार्यान्वित झाली असून 112 केंद्रांवर काम सुरू आहे. आतापर्यंत 10 लाख नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 1.15 कोटी नागरिकांना वाहनचालक प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, प्रस्तावित नागपूर–हैदराबाद द्रुतगती मार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी सुमारे साडेतीन तासांवर येईल, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच नागपूरमधील इंदोरा–दिघोरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून 1 ऑगस्ट 2026 रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande