
रायगड, 13 जून (हिं.स.)श्रीवर्धन शहर व परिसरात मोकाट घोड्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच समुद्रकिनाऱ्यावरील घोडेस्वारी व्यवसाय मंदावल्याने काही घोडेमालकांकडून घोडे मोकाट सोडले जात असल्याचे दिसून येत आहे.
हे घोडे सध्या रस्ते, शेतजमिनी, बागायती तसेच वस्ती परिसरात मुक्तपणे फिरत असल्याने स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच शेतकरी व बागायतदारांच्या पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
अलीकडेच दांडे पाच रस्ता चौक परिसरात घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन घोडे वेगाने धावत असताना त्यांनी एका वाहनाला धडक दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक मुलगी थोडक्यात बचावली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला आहे. घोड्यांची नोंदणी करणे, मालकांची जबाबदारी निश्चित करणे आणि नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)