
लातूर, 13 जून (हिं.स.)।
लंडन येथे आयटी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या आणि महिन्याला आठ लाख रुपयांचे भरघोस वेतन घेणाऱ्या बोडका (ता. अहमदपूर) येथील सुपुत्राने, हणमंत अप्पाराव पाटील (४०) यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने दोन कोटी रुपयांचा दावा दाखल केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आठ दिवसांपूर्वी लंडन येथे घडली असून, त्यांच्या मूळ गावी बोडका येथे शोकाकुल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत पाटील यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, परंतु त्यांना अपत्य नव्हते. गेल्या वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे ते विभक्त राहत होते. काही दिवसांपूर्वी पत्नीने त्यांच्यावर दोन कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. या मानसिक तणावामुळे खचलेल्या हणमंत पाटील यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना फोन करून, मी जगणार नाही, माझी वाट पाहू नका, मी आत्महत्या करत आहे, सर्वांची काळजी घ्या, असा भावनिक निरोप दिला होता. परदेशात उच्च पदावर कार्यरत असतानाही केवळ कौटुंबिक कलहामुळे एका तरुण अभियंत्याने जीवन संपवल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
हणमंत पाटील यांचा मृतदेह लंडन येथून विमानाने पुण्यात आणण्यात आला आणि त्यानंतर रस्तेमार्गे तो बोडका या त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आला. मृत्यूच्या आठ दिवसानंतर पार्थिव गावी दाखल झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी होते. हणमंत पाटील हे गावातील प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होत असत. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असून प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, अशा शब्दात ग्रामस्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. या घटनेमुळे बोडका गावावर शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis