
लातूर, 13 जून (हिं.स.)।
समाजाच्या सुरक्षेसाठी खांद्यावर जबाबदारीची वर्दी असली, तरी त्या वर्दीआड धडधडणारे हृदय हे समाजाप्रती संवेदनशील असते, याचा प्रत्यय लातूर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या कृतीतून दिला आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिसांनी यावेळी समाजसेवेचा वेगळा आदर्श घालून देत रक्तदानाच्या माध्यमातून अनेक अनोळखी जीवांना नवजीवन देण्याचा संकल्प साकारला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, लातूर पोलीस दल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्लारी व गातेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजसेवेच्या कार्यात आपला सहभाग नोंदविला.
आजच्या धावपळीच्या युगात अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागतो. अपघातग्रस्त, गंभीर आजारांवरील उपचार घेणारे रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले नागरिक आणि प्रसूतीदरम्यान रक्ताची आवश्यकता असलेल्या महिलांसाठी रक्त हा जीवनाचा आधार ठरतो. या वास्तवाची जाणीव ठेवून शेकडो रक्तदाते या मोहिमेत सहभागी झाले आणि समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभे केले.
या शिबिरात किल्लारी येथे ११५ आणि गातेगाव येथे ५१ अशा एकूण १६६ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. प्रत्येक रक्तपिशवी ही एखाद्या गरजू व्यक्तीसाठी आशेचा किरण ठरणार असून या रक्तसाठ्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदान शिबिर न राहता माणुसकीचा उत्सव ठरला.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते लातूर पोलीस व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या “वन हेल्मेट – वन लाईफ” या उपक्रमाचे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. रक्तदानातून दुसऱ्याचे जीवन वाचविताना स्वतःच्या जीवनाचेही रक्षण करण्याचा संदेश या अभिनव उपक्रमातून देण्यात आला. समाजहित आणि रस्ते सुरक्षा या दोन महत्त्वाच्या विषयांची प्रभावी सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. कारण त्यांनी दिलेले रक्त कोणाच्या तरी आयुष्यात नव्या आशेचा श्वास निर्माण करणार होते. समाजात संवेदनशीलता, परस्पर सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे या शिबिरातून अधोरेखित झाले.
लातूर जिल्हा पोलीस दल केवळ कायद्याचे रक्षक नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा विश्वासू मित्र आहे, ही भावना या उपक्रमातून अधिक दृढ झाली आहे. नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्याबरोबरच समाजात रक्तदानाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यात या शिबिराला मोठे यश मिळाले. १६६ रक्तपिशव्यांच्या रूपाने जमा झालेला हा अमूल्य रक्तसाठा अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis