
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पीरिऑडिक लेबर फोर्स सर्वे (पीएलएफएस) आणि ॲन्युअल सर्वे ऑफ अनइन्कॉर्पोरेटेड एंटरप्रायझेस (एएसयुएसई) या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करून करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपआयुक्त एस. एम. रचावाड, जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी तसेच आयपॉस संस्थेचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसायांची स्थिती आणि असंघटित क्षेत्रातील आर्थिक उपक्रमांची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचे महत्त्व अधोरेखित केले. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक-आर्थिक विकास योजना तसेच विविध धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएलएफएस सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांची रोजगार, बेरोजगारी, व्यवसाय, कामाचे स्वरूप, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यासंदर्भातील माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत प्रत्यक्ष भेटी व मुलाखतींच्या माध्यमातून संकलित करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील श्रमबाजाराची सद्यस्थिती, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि वेतनाधारित रोजगाराबाबतची अद्ययावत माहिती या सर्वेक्षणातून उपलब्ध होणार आहे.
एएसयूएसई सर्वेक्षणाद्वारे नोंदणीकृत नसलेल्या बिगर कृषी क्षेत्रातील लघुउद्योग, सेवा व्यवसाय, दुकाने, कार्यशाळा, घरगुती उद्योग आणि इतर असंघटित व्यावसायिक उपक्रमांची माहिती एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत गोळा केली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील रोजगार, उत्पादनक्षमता, उत्पन्न, स्थूल मूल्यवर्धन आणि आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित करून राज्य व जिल्हास्तरीय उत्पन्नाचे अंदाज तसेच विकास निर्देशांक तयार करण्यास मदत होणार आहे.
सर्वेक्षणासाठी आयपॉस संस्थेमार्फत नियुक्त अधिकृत क्षेत्रीय कर्मचारी तसेच सांख्यिकी अधिकारी नागरिकांच्या घरी व उद्योग आस्थापनांमध्ये भेट देणार आहेत. नागरिकांनी व उद्योजकांनी त्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठी वापरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा प्रशासन, हिंगोली आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून “विश्वसनीय माहिती – सक्षम नियोजन – विकसित भारत” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis