माढ्यात राजकीय गणिते बदलणार का? धनंजय ढोकळे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा निवडणुकीतील मार्ग सध्या सुकर दिसत आहे. तालुक्यातील ५० मतदारांपैकी महायुतीकडे सुमारे ३९ मतांचे संख
Vidhan Parishad


सोलापूर, 13 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा निवडणुकीतील मार्ग सध्या सुकर दिसत आहे. तालुक्यातील ५० मतदारांपैकी महायुतीकडे सुमारे ३९ मतांचे संख्याबळ असल्याने राऊत यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे.

महायुतीच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार संजय शिंदे, प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे तसेच शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे हेही राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत.

दुसरीकडे महाआघाडीच्या गोटात काही प्रमाणात संदिग्धता असल्याचे चित्र आहे. महाआघाडीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची भूमिका जाहीरपणे मांडल्याने आघाडीतील अंतर्गत नाराजी चर्चेत आली आहे. आधीच संख्याबळ कमी असताना या घडामोडींमुळे महाआघाडीसमोरचे आव्हान अधिक कठीण झाल्याचे बोलले जात आहे.

महाआघाडीचे उमेदवार वसंत देशमुख यांच्या प्रचाराची जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वीकारली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच महायुतीतील संभाव्य असंतुष्ट मतदारांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्नही विरोधकांकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

निवडणुकीतील कागदावरील संख्याबळात काही प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सध्याच्या घडीला प्रचारयंत्रणा, स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा आणि संख्याबळ या सर्व बाबींमध्ये राजेंद्र राऊत यांना आघाडी असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, कुर्डूवाडी नगरपरिषदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते धनंजय ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या सदस्यांची भूमिका काय राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande