रोटाव्हेटरच्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू
बीड, 13 जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीची मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या केज तालुक्यातील साळेगाव येथील 32 वर्षीय तरुण शेतकरी मंगेश बाबुराव टोपे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दह
रोटाव्हेटरच्या भीषण अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू


बीड, 13 जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीची मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या केज तालुक्यातील साळेगाव येथील 32 वर्षीय तरुण शेतकरी मंगेश बाबुराव टोपे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वी खरीप पेरणीसाठी शेताची मशागत करण्याच्या उद्देशाने मंगेश टोपे यांनी भाड्याने ट्रॅक्टर आणला होता. शेतात रोटाव्हेटर सुरू असताना ठिबक सिंचनाचा पाईप त्याच्या पात्यांमध्ये अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाईप काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते थेट फिरत्या रोटाव्हेटरच्या पात्यांवर पडले.

या भीषण अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर झाला तसेच कानालाही मोठी इजा झाली. शेतात उपस्थित असलेल्या रमण डिकले आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णालयात त्यांच्या पोटावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अचानक प्रकृती खालावून रक्तदाब अनियंत्रित झाल्याने डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर मंगेश टोपे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

मंगेश टोपे हे पदवीधर असूनही शेती व्यवसायाला वाहून घेतलेले कष्टकरी आणि मनमिळावू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली आणि तीन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. कर्त्या पुरुषाच्या निधनाने टोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून साळेगावसह संपूर्ण केज तालुक्यात शोककळा पसरली आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande