पुण्यातील पालकाची सव्वा आठ लाखांची फसवणूक; सिकंदराबादचा आरोपी जेरबंद
पुणे, 13 जून (हिं.स.)। पुण्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ४० विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडक
पुण्यातील पालकाची सव्वा आठ लाखांची फसवणूक; सिकंदराबादचा आरोपी जेरबंद


पुणे, 13 जून (हिं.स.)।

पुण्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ४० विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तेलंगणातील एका आरोपीला अटक केली आहे.

आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद आणि मुंबई येथे फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यातील एका पालकाची सुमारे सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संबंधित पालकाने दिलेल्या तक्रारीवरून १८ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपीने पुणे आणि परिसरातील अनेक पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपी पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, आरोपी अरविंद आरोगोंडाला काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई पोलिसांनीही फसवणुकीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande