
नांदेड, 13 जून, (हिं.स.)। आगामी २८ जून २०२६ रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या आणि स्टॉप डायरिया कॅम्पेन २०२६' (STOP Diarrhoea Campaign 2026) च्या पूर्वतयारीसाठी जिल्हा कार्य बल गट (टास्क फोर्स) व जिल्हा सुकाणू समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करणे, ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आणि आरोग्य विभागाच्या इतर विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बुटे यांच्यासह जिल्हा सुकाणू समिती आणि कार्य बल गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट व सूक्ष्म नियोजन (नांदेड जिल्हा) :
बैठकीत आगामी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या उद्दिष्टांचे अधिकृत सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण ३,८८,५२६ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २,४८,७२८, शहरी भागातील ४६,९४३ आणि महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील ९२,८५५ अपेक्षित लाभार्थ्यांचा समावेश आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यात खालीलप्रमाणे चोख नियोजन करण्यात आले आहे.
एकूण पोलिओ बूथ संख्या: २,८४३ (ग्रामीण: २,२८३, शहरी: २७५, मनपा: २८५)
अपेक्षित एकूण मनुष्यबळ: ७,४३१ कर्मचारी
एकूण पर्यवेक्षक (Supervisors): ६४३
गृहभेटीसाठी निश्चित केलेली घरे (IPPI): ७,५५,३७९ घरे
गृहभेटीसाठी आवश्यक टीम: १,४१५ टीम्स
ट्रान्झिट टीम (रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्ट): २७७ टीम्स
मोबाईल टीम (दुर्गम व स्थलांतरित भागांसाठी): १८७ टीम्स
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis