
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दोन सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली. गुलमंडी परिसरातील पाहणीदरम्यान रस्त्यांवर कचरा साचलेला आढळला आणि संबंधित कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर असल्याचे समोर आले. यानंतर या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडे सुमारे दोन हजार कर्मचारी कार्यरत असूनही काही ठिकाणी कामचुकारपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडून गणवेश व ओळखपत्राचा वापर न होणे, तसेच खासगी व्यक्तींकडून काम करून घेण्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे स्वच्छता विभागात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis