
विशेष उन्हाळी क्रीडा शिबिराचा उत्साहात समारोप
नाशिक, 13 जून (हिं.स.)। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक आश्रमशाळेत शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसापासून क्रीडा शिक्षक उपलब्ध होणार आहे. प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात स्वतंत्र 'क्रीडा अधिकारी' नियुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केली.
पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे आदिवासी विकास विभाग व स्ट्राईडर्स फाउंडेशन (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ दिवसीय विशेष उन्हाळी क्रीडा शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठूबे, उपसंचालक (क्रीडा व युवा) स्नेहल साळुंखे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्र सिंग, स्ट्राईडर्स फाउंडेशनचे सुंदर श्याम शेनॉय, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील नेरकर, रामचंद्र तडवी, निंबा कापडणीस आदी उपस्थित होते.
आदिवासी विकास विभागामध्ये येत्या काही महिन्यांत 'उपसंचालक क्रीडा अधिकारी' पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
याशिवाय दुर्गम भागातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी तोरणमाळ (जिल्हा नंदुरबार) येथे सेंटर ऑफ एक्सेलन्स सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात प्रथमच विशेष उन्हाळी क्रीडा शिबिराची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि संधी उपलब्ध करून देऊन त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा विभागाचा मानस असून, हा उपक्रम पुढील काळात दरवर्षी सातत्याने राबविण्यात येईल, असे अपर आयुक्त पावरा यांनी सांगितले.
दरम्यान, विशेष क्रीडा शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ७० गुणवंत खेळाडूंना ट्रॅकसूट, क्रीडा शूज, सॉक्स व टोपी अशा दर्जेदार क्रीडा साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट
तज्ज्ञांचे मार्गदर्शन अन अनुभवांची शिदोरी
विशेष क्रीडा शिबिरामध्ये खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, आहार व्यवस्थापन, क्रीडा संस्कार आणि शिस्तीचे धडे देण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये किसन तडवी (उपजिल्हाधिकारी व आंतरराष्ट्रीय धावपटू), शैलजा जैन (आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक), विजेंद्र सिंग (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक), वासुदेव देसले (उपविभागीय पोलीस अधिकारी), चेतना शर्मा (योग तज्ज्ञ) यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV