गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या उद्देशाने १४ जून रोजी ऑनलाइन योग सत्र
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून,योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने १४ जून २०२६ रो
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या उद्देशाने १४ जून रोजी ऑनलाइन योग सत्र


छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)।

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून,योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने १४ जून २०२६ रोजी ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.हे योग सत्र सकाळी ६.१५ ते ७.१५ या कालावधीत होणार असून,या उपक्रमाद्वारे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालय,भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या योग सत्राचे प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-३१५-७००८ वर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागींना सत्राची लिंक तसेच आवश्यक सूचना संदेशाद्वारे पाठविण्यात येणार आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब) सत्रात लॉग-इन करणे आवश्यक राहील.नोंदणीकृत प्रत्येक उपकरणाची स्वतंत्र सहभाग नोंद ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक,विद्यार्थी,खेळाडू तसेच शाळा,महाविद्यालये आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचारी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande