
पिंपरी, 13 जून, (हिं.स.) राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘हरित शपथ’ या ई-प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ‘माझी वसुंधरा’च्या संकेतस्थळावर वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या ई-प्रतिज्ञा आणि त्यानुसार केलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती व गटांचे गुणांकन करण्यात येणार आहे. वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचे जतन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि स्वच्छता यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले. ‘हरित शपथ’ ही केवळ प्रतिज्ञा नसून वसुंधरा संवर्धनासाठीची सामूहिक बांधिलकी असल्याचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नमूद केले. या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक नागरिकांनी पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी शासन, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु