पुणे जिल्ह्यातील 3.15 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता
पुणे, 13 जून (हिं.स.)। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 3 लाख 15 हजार 569 शेतकरी सभासदांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेद्वारे जिल्हा बँकेच्या शेतकर
Former karjmafi


पुणे, 13 जून (हिं.स.)। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 3 लाख 15 हजार 569 शेतकरी सभासदांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेद्वारे जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांना एकूण 2 हजार 102 कोटी 91 लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जासाठी 83 हजार 376 शेतकऱ्यांना सुमारे 749 कोटी 14 लाख रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेत 21 हजार 299 शेतकऱ्यांना 425 कोटी 98 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत 2 लाख 10 हजार 894 शेतकऱ्यांना 927 कोटी 79 लाख रुपयांची मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या तिन्ही योजनांचा एकत्रित लाभ 2102 कोटी 91 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून अपात्रतेचे निकष लागू करण्यात येणार आहेत. त्यानंतरच अंतिम पात्र लाभार्थी यादी निश्चित केली जाणार असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणि लाभाची एकूण रक्कम यामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.

या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून अंतिम पात्रता निश्चित झाल्यानंतर लाभार्थ्यांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande