पीएमआरडीएच्या १५ टीपी योजनांना मंजुरी; अंमलबजावणी मात्र रखडली
पुणे, 13 जून (हिं.स.)पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) १५ टाऊन प्लॅनिंग (टीपी) योजनांना शासनाची मंजुरी मिळाली असली, तरी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे या योजनांची अंमलबजावणी अद्याप रखडलेली आहे. मंजुरीनंतर आवश्यक असलेली नक
PMRDA


पुणे, 13 जून (हिं.स.)पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) १५ टाऊन प्लॅनिंग (टीपी) योजनांना शासनाची मंजुरी मिळाली असली, तरी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे या योजनांची अंमलबजावणी अद्याप रखडलेली आहे. मंजुरीनंतर आवश्यक असलेली नकाशा प्रसिद्धी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया देखील संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. या टीपी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास पीएमआरडीए हद्दीत सुमारे २३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड विकसित होणार आहे. त्यामुळे अहमदनगर आणि सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडीसह पुणे जिल्ह्यातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी शासनाने शहराबाहेरील रिंगरोडचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचबरोबर विकास नियोजनाचा भाग म्हणून टाऊन प्लॅनिंग योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द झाल्यानंतर राज्य शासनाने टीपी योजना तयार करण्यास परवानगी दिली होती. त्या अनुषंगाने पीएमआरडीएने तयार केलेल्या वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी आणि होळकरवाडी परिसरातील दोन अशा एकूण चार योजनांना यापूर्वी अंतिम मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आणखी १५ नव्या टीपी योजनांनाही शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या योजनांच्या पुढील टप्प्यात संबंधित नागरिकांची सुनावणी घेऊन त्यानंतर अंतिम नकाशे तयार करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएने यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र स्थानिक स्तरावरील विरोध आणि विविध तांत्रिक अडचणींमुळे या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी अद्याप प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande