श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी 23-24 जूनला मंदिर दर्शनासाठी बंद
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संवर्धन प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक कामे सुरक्षितपणे
Vithal


सोलापूर, 13 जून (हिं.स.)। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संवर्धन प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक कामे सुरक्षितपणे पार पाडता यावीत तसेच मूर्तीचे पावित्र्य आणि सुरक्षा अबाधित राखता यावी, यासाठी 23 व 24 जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मूर्ती संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. यासंदर्भात 11 जून रोजी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्राप्त झालेल्या तांत्रिक मार्गदर्शन व शिफारशींच्या आधारे 22 ते 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिर दर्शनाच्या नियोजनात आवश्यक बदल करावेत, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande