
पुणे, 13 जून (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट-मोजे, दप्तरे, वह्या, लेखन साहित्य, स्वेटर तसेच अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेअंतर्गत आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे, हा प्रशासनाचा उद्देश आहे. मात्र, केवळ निधी वितरित करून प्रशासन थांबणार नसून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आवश्यक साहित्याची खरेदी केली आहे की नाही, याचीही शाळास्तरावर पडताळणी करण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित विभागाला तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी शुक्रवारी दिली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून १५ जूनपर्यंत साहित्य खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत मिळण्यास मदत होणार असून शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु