
पुणे, 13 जून (हिं.स.)। पुणे रेल्वे स्थानक परिसरात पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी रविवार, १४ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत नऊ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक एक्सप्रेस आणि लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून काही गाड्या खडकी आणि हडपसर स्थानकांवरून चालविण्यात येणार आहेत.
ब्लॉकच्या कालावधीत इलेक्ट्रिक, सिग्नल, दूरसंचार आणि ओव्हरहेड यंत्रणांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. या काळात मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ उपलब्ध नसतील. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा तसेच काही गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. पुणे यार्डातील रेल्वे वाहतुकीची भविष्यातील सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी ही कामे अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने इंडियन रेल्वेच्या चौकशी पोर्टल किंवा अधिकृत NTES ॲपच्या माध्यमातून गाडीची सद्यस्थिती आणि अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु