नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग
नाशिक, 13 जून (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले असून महायुतीकडून आपले लोकप्रतिनिधी एकत्र ठेवण्यासाठी ‘सेफ झोन’ रणनीती राबवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मि
नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग


नाशिक, 13 जून (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले असून महायुतीकडून आपले लोकप्रतिनिधी एकत्र ठेवण्यासाठी ‘सेफ झोन’ रणनीती राबवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ, अनपेक्षित घडामोडी किंवा क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे विविध पक्षांचे नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक ठाण्याला रवाना करण्यात आले आहेत, तर भाजपचे नगरसेवक येत्या दोन दिवसांत स्वतंत्रपणे सुरक्षित ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधीही लवकरच अशाच प्रकारे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नाशिक महापालिकेत भाजपचे 72 तर शिंदे गटाचे 26 नगरसेवक असल्याने महायुतीकडे संख्याबळाच्या दृष्टीने स्पष्ट आघाडी आहे. तरीही, प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षांकडून काटेकोर नियोजन केले जात आहे.

दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी कोणतेही अंतर्गत मतभेद किंवा नाराजी नसल्याचा पुनरुच्चार केला असून सर्व नगरसेवक एकदिलाने मतदान करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व राजकीय पक्षांचे लक्ष नगरसेवकांच्या हालचालींवर केंद्रीत झाले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande