
पुणे, 13 जून (हिं.स.)।
पिंपरी-निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून पोलिसांनी या आंतरजिल्हा रॅकेटविरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या वाघोली येथील डॉ. अतुल जाधव याच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सहावे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात डॉक्टर, मेडिकलचालक आणि एजंट यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संशयितांकडे आपला तपास केंद्रित केला आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान वाघोली येथील डॉ. अतुल जाधव हा स्वतः सोनोग्राफी मशीनचा वापर करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे उघड झाले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली.
चौकशीत डॉ. जाधव याने हे प्रतिबंधित मशीन यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मेडिकल साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार लोणी पोलिस आणि अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने डॉ. जाधवला सोबत घेऊन पुण्यातील वाघोली परिसरातील त्याच्या केंद्रावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान विनानोंदणीकृत सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. या मशिनच्या माध्यमातून वाघोली आणि पुणे परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून रॅकेटमधील अन्य संबंधितांचा शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु