
जळगाव, 13 जून (हिं.स.) : राज्यातील अर्थखात्याच्या वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा माजी मंत्री अनिल पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे.
“राज्यात अर्थ खाते सांभाळण्यास सक्षम एकही नेता नाही,” या संजय राऊत यांच्या विधानावर अनिल पाटील यांनी जळगावातून तीव्र प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला. “राऊतांची टीका पूर्णपणे अर्थहीन असून ज्यांनी मूळ शिवसेनेचे रूपांतर ‘चिवसेना’ केले, त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना भूतकाळाचा विसर पडलेला दिसतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने चर्चा होत होती, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील मंत्रिमंडळात अर्थ खाते कोणाकडे द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. या निर्णयावर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत यांना नाही.
“राऊत रोज सकाळी उठून महायुती सरकारवर टीका करतात. त्याऐवजी त्यांनी स्वतःचा पक्ष कसा टिकवायचा याकडे लक्ष द्यावे,” असा टोलाही अनिल पाटील यांनी लगावला.
या वक्तव्यांमुळे जळगावसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर