
नांदेड, 13 जून (हिं.स.)।
कष्ट, जिद्द, शिस्त आणि देशसेवेचे स्वप्न… या गोष्टींच्या बळावर संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेतील श्री छ. शिवाजी हायस्कूल सगरोळीच्या सहा युवा विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यात निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गाव, संस्था आणि परिसरासाठी अभिमानाचा क्षण आहे.
स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण त्यासाठी अथक परिश्रम घेऊन ते सत्यात उतरवणारे फार थोडे असतात. मारोती गायकवाड, अभिषेक थोटवे, शुभम सोनकांबळे, अमोल कांबळे, महेश तुकडे, सूरज वने या विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटीने आणि दृढनिश्चय तसेच योग्य मार्गदर्शनाने हे सिद्ध करून दाखवले आहे की ग्रामीण भागातील युवकांमध्येही देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याची अमर्याद क्षमता आहे.
या यशामागे संस्थेच्या उड्डाण अभ्यासिकेत संदर्भ साहित्य, संस्थेच्या सनराईज क्रीडा प्रकल्पातून मिळालेले शारीरिक प्रशिक्षण, तसेच पालकांचा विश्वास आणि पाठबळ यांचे मोलाचे योगदान आहे.
भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करणे म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नव्हे, तर मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे होय. देशासाठी जगण्याचा आणि प्रसंगी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प या तरुणांनी केला आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे.
या सहा विद्यार्थ्यांच्या यशामुळे अनेक तरुणांच्या मनात नवी उमेद, नवी प्रेरणा आणि नवे ध्येय निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाची ही ज्योत भविष्यात आणखी अनेक युवकांच्या स्वप्नांना दिशा देईल, यात शंका नाही.
सगरोळीच्या मातीतून देशरक्षणासाठी सज्ज झालेले हे सहा जवान म्हणजे आमच्या संस्थेचा, पालकांचा आणि संपूर्ण गावाचा अभिमान आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis