
रत्नागिरी, 13 जून, (हिं.स.) । कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बेकायदेशीर आणि बोगस कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रत्नागिरी तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे व उपाध्यक्ष विलास चाळके यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.
कुर्धे येथील नदीवर जिल्हा परिषद बांधकाम कंत्राटदाराकडून पुलाचे काम सुरू होते. मंगळवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या कामाचे कोणतेही अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा (Tender) किंवा वर्क ऑर्डर अस्तित्वात नव्हती. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कंत्राटदाराने कोणाच्या आदेशाने हे काम सुरू केले, असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंत्राटदारांची मनमानी आणि बोगस कामे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अशा बोगस कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी देऊ नये, तसेच विनापरवाना काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे, अशी मागणी श्री. पाटील यांनी केली आहे. या भ्रष्टाचारात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करून केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन देताना शिवसेना आणि युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख किरण तोडणकर, साजिद पावसकर, उपविभाग प्रमुख सचिन सावंतदेसाई, अजिंक्य सनगरे आणि आदेश (आबू) भाटकर यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी