जळगाव विधान परिषद निवडणूक; तिरंगी लढतीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
जळगाव, 13 जून (हिं.स.)जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शरद ता
जळगाव विधान परिषद निवडणूक; तिरंगी लढतीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली


जळगाव, 13 जून (हिं.स.)जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली असून राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शरद तायडे यांच्यात मुख्य लढत होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र, प्रहार संघटनेचे नेते अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनिल चौधरी यांचा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी असलेला दांडगा संपर्क आणि वैयक्तिक हितसंबंधांमुळे ते महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर सर्वात तगडे आव्हान उभे करू शकतात, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार नव्हे, तर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी मतदान करत असतात. अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींची मोठी जमवाजमव करून आपली ताकद दाखवून दिली होती. भुसावळ आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चौधरी कुटुंबाचा असलेला वैयक्तिक प्रभाव आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे अनेक नाराज लोकप्रतिनिधी छुपेपणाने चौधरी यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande