नाशिकमध्ये महत्त्वाच्या सर्वेक्षणाला सुरुवात
Two important surveys launched in the district
Two important surveys


रोजगार व बेरोजगारीचे अचूक चित्र समोर येणारनाशिक, 13 जून (हिं.स.) : राज्यातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांना सुरुवात झाली आहे.

जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) ही दोन्ही सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणांतून राज्यातील रोजगार परिस्थितीचे वास्तव चित्र समोर येणार आहे.

या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात पालक सचिव एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सह आयुक्त सरिता यादव, उप आयुक्त जयवंत आढाव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच सांख्यिकी अधिकारी (निवृत्त) कुंदन कांबळे उपस्थित होते.

सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय , भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत MahaSTRIDE प्रकल्पा अंतर्गत ही सर्वेक्षणे केली जात आहेत.

PLFS सर्वेक्षणाद्वारे रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार, तसेच महिला कामगार सहभाग याबाबत अद्ययावत माहिती मिळणार आहे. तर ASUSE सर्वेक्षणातून उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील असंघटित उद्योगांची संख्या, रोजगार, वेतन, उत्पादकता आणि स्थूल मूल्यवर्धन यासारखे महत्त्वाचे आर्थिक निर्देशक संकलित केले जाणार आहेत.

सर्वेक्षणासाठी नियुक्त संस्थेचे प्रशिक्षित कर्मचारी निवडक कुटुंबे व उद्योगांना भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. संकलित माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande