निधीअभावी मेळघाटमधील कामे रखडली
- जिल्हा परिषदेला शासनाच्या १८ कोटींची प्रतीक्षा, कंत्राटदारही वैतागले अमरावती, 13 जून (हिं.स.) मेळघाटातील नऊ गावांमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाच जलजीवनची ४७ गावांतील कामे थांबल्याने पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या कामांसाठी क
निधीअभावी मेळघाट मधील कामे रखडली


- जिल्हा परिषदेला शासनाच्या १८ कोटींची प्रतीक्षा, कंत्राटदारही वैतागले

अमरावती, 13 जून (हिं.स.)

मेळघाटातील नऊ गावांमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाच जलजीवनची ४७ गावांतील कामे थांबल्याने पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या कामांसाठी केंद्र शासनाचा १५, तर राज्य शासनाचा ३ असा एकूण १८ कोटींचा निधी हवा आहे. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही यंत्रणाही हतबल झाले आहेत. परिणामी निधीअभावी पाणीपुरवठा योजनेची कामे थांबली आहेत. ज्या गावांमध्ये जलजीवनची कामे थांबली, त्या गावांचे जलसंकट अधिक गडद झाले आहे.

गावात पाण्याचा स्रोत नसल्यामुळे त्यांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यासाठी मोठी पायपीट होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांत जलजीवन अंतर्गत ६६६ कामे सुरू आहेत. या कामांवर २६२ कोटी ८ लाख ८१ हजार खर्च केले जात आहेत. यापैकी आजपर्यंत ६०७ कामे पूर्णत्वास गेली असून, उर्वरित ५९ कामे थांबली आहेत. यामध्ये अलीकडेच सुरू केलेली; परंतु निधीअभावी थांबलेली नऊ, २५ ते ५० टक्के पूर्ण झालेली साठ, पन्नास ते पंचाहत्तर टक्के पूर्णत्वास गेलेली सहा आणि ९५ टक्क्यांवर अडकलेली २४ कामे आहेत. या कामांच्या माध्यमातून ४६ पैकी काही गावांत नव्या नळयोजना, तर काही गावांत नळयोजनांची दुरुस्ती केली जाणार होती; परंतु निधीच्या अभावामुळे संपूर्ण प्रक्रियेलाच ब्रेक लागला आहे.

या गावांतील कामे थांबलीत

चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १९, धारणी तालुक्यातील ८, धामणगाव रेल्वे, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील प्रत्येकी चार, नांदगाव खंडेश्वर व अमरावती तालुक्यातील प्रत्येकी तीन आणि भातकुली व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा कामे थांबण्यात समावेश आहे. या ४७ गावांमध्ये जलजीवनच्या ५९ योजना हाती घेण्यात आल्या होत्या; परंतु निधीअभावी सध्या त्या रखडल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande