काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी कट; पक्षातीलच नेत्यांवर शिंदे यांची टीका
पुणे, 13 जून (हिं.स.)। पुणे विधानपरिषद निवडणूक ही ‘मॅचफिक्सिंग’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे शहरात काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये पक्षातीलच काही प्रदेशस्तरीय
Vidhan parihsad


पुणे, 13 जून (हिं.स.)। पुणे विधानपरिषद निवडणूक ही ‘मॅचफिक्सिंग’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे शहरात काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये पक्षातीलच काही प्रदेशस्तरीय नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करत आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठविल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी वारंवार निमंत्रण देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी काँग्रेसविरोधात निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेसच्या २६ नगरसेवकांचा पराभव झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

असे असतानाही विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत राज्य नेतृत्वाकडून सूचना आल्याने आम्ही पक्षादेश मान्य करून पाठिंबा दिला. यासाठी आमच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. मात्र, आमचा विरोध असतानाही पक्षशिस्त पाळली, असे त्यांनी सांगितले.

तथापि, संबंधित उमेदवाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता उमेदवारी मागे घेतल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संपूर्ण घडामोडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande