
पुणे, 13 जून (हिं.स.) राज्यात सध्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून खतांचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू नये यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून केंद्रीय कृषिमंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचे भरणे यांनी सांगितले. संभाव्य संकट लक्षात घेऊन खतपुरवठा अखंडित राहण्यासाठी शासन स्तरावर नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, २०१९ मधील कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नव्हता. अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. दोन लाख रुपयांवरील अतिरिक्त रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः भरल्यास त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. या निर्णयामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु