
जळगाव, 13 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने कोरडे दिवस (Dry Days) जाहीर केले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दि. 18 जून 2026 रोजी होणार असून मतमोजणी दि. 22 जून 2026 रोजी पार पडणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 142 (1) अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले आहेत. जारी आदेशानुसार, दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत 48 तासांचा कोरडा दिवस लागू राहणार आहे. त्यानंतर दि. 17 जून रोजी संपूर्ण दिवस, दि. 18 जून रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत तसेच दि. 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी असणार आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील सर्व किरकोळ व ठोक मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर