
पुणे, 13 जून (हिं.स.)। मुळशी धरणातील एकूण सात टीएमसी पाणीवाटपाच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुणे शहरासाठी राखीव ठेवण्यात आलेले पाच टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असून आवश्यक तांत्रिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुळशी धरणातील एक टीएमसी पाणी पीएमआरडीएला, एक टीएमसी चिंचवडसाठी आणि पाच टीएमसी पुणे महानगरपालिकेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, मुळशी धरण टाटा समूहाच्या मालकीचे असल्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत काही आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त राज्य सरकारला पत्र पाठविणार असल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
दरम्यान, पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्यात येत असताना कालव्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. धरणांमध्ये सुमारे पाच टीएमसी पाणी शिल्लक असताना दोन ते तीन टीएमसी पाणी कालव्यांमधून सोडले जात असल्याची माहिती काही सदस्यांनी बैठकीत मांडल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
शहरातील वाढती पाण्याची गरज आणि उपलब्ध साठा लक्षात घेता मुळशी धरणातील राखीव पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु