सांगोल्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच – शहाजी बापू पाटील
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना प्रचंड बहुमताने
सांगोल्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच – शहाजी बापू पाटील


सोलापूर, 13 जून (हिं.स.)।

सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवशीच निश्चित झाला असून आता केवळ औपचारिकता बाकी असल्याचे ते म्हणाले. सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असून एका मताचाही फरक पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना महायुतीच्या उमेदवारामागे पूर्ण ताकदीने उभी राहील, अशी ग्वाही दिली. राजेंद्र राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असे ते म्हणाले.

यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत यांनी महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि नेत्यांचे आभार मानले. जिल्ह्यात महायुतीची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी असून आमदार शहाजी बापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने सर्वांचा आशीर्वाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीत उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande