योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी - मंत्री जयकुमार रावल
मुंबई, 13 जून (हिं.स.)। योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले. आंत
मुंबई


मुंबई, 13 जून (हिं.स.)। योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूतांसाठी आयोजित केलेल्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते.

राजशिष्टाचार विभाग आणि कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन ड्राईव्ह येथील संस्थेच्या सभागृहात शनिवारी सकाळी हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मंत्री श्री रावल यांच्या हस्ते योग सत्राचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शंखनादाने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त निवित श्रीवास्तव यांनी मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत केले. कैवल्यधाम या भारतातील सर्वात जुन्या योग संशोधन व शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्या प्रतिमेस मंत्री श्री रावल आणि मान्यवरांनी पुषार्पण केले.

यावेळी मंत्री श्री रावल म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली जागतिक मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध देश, संस्कृती आणि परंपरांतून आलेल्या समाजास आरोग्य, शांतता आणि आनंद या समान मूल्यांनी जोडण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. योगाच्या शास्त्रीय परंपरेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी कैवल्यधाम संस्थेने केलेल्या शतकोत्तर कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

यावेळी कैवल्यधाम योग संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यविषयक लाभ समजावून सांगितले. योग सत्रात युगांडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड, बांगलादेश, ब्रिटन, घाना, जपान, युक्रेन, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, इजिप्त, नॉर्वे, ब्राझील, मॉरिशस, थायलंड, तुर्की, कॅनडा, आयर्लंड, येमेन, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, दक्षिण कोरिया, पेरू आणि ग्रीस आदी 26 देशांचे महावाणिज्यदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा केला जातो. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि योग परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करून योगाच्या जागतिक प्रसारासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande