“ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत तथ्यांची पडताळणी अत्यावश्यक” — उज्ज्वल निकम
नागपूर, 14 जून (हिं.स.) : ‘ब्रेकिंग न्यूज’च्या तीव्र स्पर्धेच्या काळात पत्रकारांची जबाबदारी अधिक महत्त्वाची असून कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची शहानिशा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी
नागपुरातील देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या बोलताना खासदार उज्ज्वल निकम


नागपूर, 14 जून (हिं.स.) : ‘ब्रेकिंग न्यूज’च्या तीव्र स्पर्धेच्या काळात पत्रकारांची जबाबदारी अधिक महत्त्वाची असून कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची शहानिशा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी केले.

विश्व संवाद केंद्र (पूर्व विदर्भ विभाग) यांच्या वतीने नागपुरात आयोजित देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. वनामती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया आणि प्रज्ञा प्रवाहाचे सुनील साठे उपस्थित होते.

कसाब प्रकरणातून पत्रकारितेला मोठा धडा

आपल्या भाषणात मुंबई दहशतवादी हल्ला खटल्याचा संदर्भ देताना निकम म्हणाले की, अजमल कसाबच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर माध्यमांची उपस्थिती होती. एका प्रसंगी कसाबने हात डोळ्याजवळ नेल्याचे पाहून काही माध्यमांनी तो रडत असल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित केले.

“प्रत्यक्षात कसाब रडत नव्हता, मात्र त्या घटनेवर आधारित अनेक चुकीचे तर्क प्रसारमाध्यमांमध्ये पसरले,” असे ते म्हणाले. या उदाहरणातून त्यांनी पत्रकारितेत वेगासोबत तथ्यपडताळणीचे महत्त्व अधोरेखित केले.

निकम यांनी पुढे सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी पडताळणीशिवाय माहिती प्रसारित करणे समाजासाठी घातक ठरू शकते. समाजजागृती करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून संविधानावरील विश्वासामुळेच देशात कायदेशीर प्रक्रिया मजबूत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय पत्रकारितेचा आधार ‘स्व’

प्रज्ञा प्रवाहाचे सुनील साठे यांनी यावेळी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासावर भाष्य करताना सांगितले की, स्वातंत्र्य आंदोलनात पत्रकारितेची महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि तिचा मूळ आधार ‘स्व’ होता. भारतीय पत्रकारिता देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून विकसित व्हावी, असे त्यांनी नमूद केले.

पत्रकारांचा गौरव

या कार्यक्रमात पत्रकार निखील भुते, दिव्येश द्विवेदी, हेमांगी कुलकर्णी, छायाचित्रकार संजय लचुरिया, निकीता गावंडे, ज्येष्ठ संपादक सुनील कुहीकर, वेद घुळघुळे आणि वैष्णवी ठाकरे यांचा शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर पाठक यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गुळवे यांनी केले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande