
लातूर, 15 जून (हिं.स.)।
उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील मुरूमकर यांना लातूर ग्रामीण मतदार संघातून अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या लातूर येथील प्रयाग या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधला यावेळी औसा मतदार संघाचे आ. अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रारंभी आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील आणि आ. अभिमन्यू पवार यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले.
उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीकरिता असलेल्या मतदारातून भाजपा आणि मित्रपक्षाशिवाय इतरही मतदारांना सोबत घेऊन भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली तर आ. अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी बसवराज पाटील यांचा विजय महत्त्वाचा असल्याचे बोलून दाखविले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास निश्चितपणे सार्थ ठरवू मतदारांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी असे याप्रसंगी बसवराज पाटील यांनी बोलून दाखविले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक मतदारांशी संवाद साधला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis