
परभणी, 15 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी (दि. 15) पाथरी आगारात घंटानाद आंदोलन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. कर्मचार्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आगार परिसर दणाणून गेला होता. संयुक्त कृती समितीच्या वतीने कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असला तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील आगार, विभागीय कार्यालये व कार्यशाळांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. पाथरी येथेही कर्मचार्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. या आंदोलनानंतरही प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संयुक्त कृती समितीने दिला आहे. त्यानुसार 22 जून रोजी राज्यभरातील सर्व आगार, विभागीय कार्यालये व कार्यशाळांमध्ये धरणे आंदोलन व गेटसभा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 29 जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विभागीय कार्यालयांवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एसटी कर्मचार्यांच्या थकीत रकमांची तात्काळ अदायगी, सातवा वेतन आयोग लागू करणे, कंत्राटी नोकरभरतीला विरोध तसेच इतर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेत्री, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव विकास नखाते, अध्यक्ष आवेद शेख, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सचिव धोंडीराम भिसे, अध्यक्ष नितीन तूपसमुंदर, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे सचिव सिद्धार्थ हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष वसंत बोराडे आणि परभणी येथील सीसीएस पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर पवार यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवून राज्यभरातील कर्मचार्यांनी पुढील लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis