विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे हर्षजीत देशमुख प्रचारातून दूर
- किडनी स्टोनमुळे आठ दिवस विश्रांतीचा सल्ला - रिंगणात कायम पण प्रचार करणार नाही अमरावती, 15 जून (हिं.स.) : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षासमोर नवे संकट उभे राहिले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना किडनी स्टोनचा त्र
आधी एन्जिओग्राफी आता किडनी स्टोन... हर्षजीत देशमुख काँग्रेस उमेदवार म्हणतात...आज नाही न उद्या नाही मतदानाच्या दिवशीही अमरावतीत येणार नाही


- किडनी स्टोनमुळे आठ दिवस विश्रांतीचा सल्ला

- रिंगणात कायम पण प्रचार करणार नाही

अमरावती, 15 जून (हिं.स.) : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षासमोर नवे संकट उभे राहिले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील आठ दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हर्षजीत देशमुख हे रविवार, 14 जून रोजी अमरावतीत येऊन प्रचाराला सुरुवात करणार असल्याची अपेक्षा होती. पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अमरावतीत पोहोचू शकले नाहीत. यानंतर त्यांनी रुग्णालयातून आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

देशमुख यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या शरीरात 11 मिमी आणि 6 मिमी आकाराचे दोन किडनी स्टोन आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून, पुढील दोन दिवसांत अपेक्षित सुधारणा न झाल्यास शस्त्रक्रिया करण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव आपण प्रचार दौरे, मतदारांच्या गाठीभेटी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नसून अधिकृत उमेदवार म्हणून कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशमुख यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर उमेदवार प्रचारापासून दूर राहणार असल्याने पक्षाच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वरिष्ठ नेतृत्वाच्या सल्लामसलतीनंतर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमुळे प्रचार ठप्प झाल्याने पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचा काँग्रेसच्या कामगिरीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाची ढासळती प्रतिष्ठा सावरण्यासाठी काँग्रेसला आता मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande