
अमरावती, 15 जून (हिं.स.) : यंदाच्या मान्सूनने अपेक्षित वेळेत हजेरी न लावल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी स्वतः शेतात उतरून शेतीची पाहणी केली. आपल्या शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी करत त्यांनी पावसाच्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली आणि शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले.
शेताच्या बांधावरून माध्यमांशी संवाद साधताना राणा म्हणाले की, अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असली तरी पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस पडल्याशिवाय पेरणी करणे धोकादायक ठरू शकते. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पाऊस पडण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केल्याचे त्यांनी नमूद केले.
राणा यांनी शेतकऱ्यांना सध्या मशागत, नांगरणी आणि इतर पूर्वतयारीची कामे पूर्ण करून शेत तयार ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र बियाणे पेरण्याचा निर्णय हवामानाचा अंदाज आणि पावसाची स्थिती लक्षात घेऊनच घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अनेक भागांत ढगाळ वातावरण असले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत घाईघाईने पेरणी केल्यास पुढील 15 ते 20 दिवस पाऊस न आल्यास बियाण्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच उगवण झालेली पिके करपण्याची शक्यता निर्माण होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
दुबार पेरणीमुळे अतिरिक्त बियाणे, मजुरी आणि इतर खर्च वाढतात. आधीच वाढत्या उत्पादनखर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
हवामानाच्या परिस्थितीवर शासनाने बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी आवश्यक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत राणा यांनी शेतकऱ्यांनी अधिकृत सल्ला मिळेपर्यंत संयम बाळगावा, असे आवाहन केले. योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत पेरणी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी