
लातूर, 02 जून (हिं.स.) लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकूर तालुक्यातील वडवळ-जानवळ मार्गावर धाडसी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल २ लाख १२ हजार ४५० रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी इरटीगा कार असा एकूण ९ लाख १२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांची माहिती संकलित करून कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात गस्त घालत होते. दरम्यान, चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील वडवळ येथे पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, वडवळ ते जानवळ मार्गावरून एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इरटीगा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडवळ-जानवळ रोडवर सापळा रचला. काही वेळात संशयित इरटीगा कार (क्र. एमएच-२४ बीएक्स-१४८५) घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. कार चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव १)किशोर लक्ष्मण भदाडे (वय २४, रा. जानवळ, ता. चाकूर) असे सांगितले.
यानंतर वाहनाची झडती घेतली असता कारच्या आतील भागात तसेच डिकीत पोत्यांमध्ये आणि बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. चौकशीदरम्यान आरोपी किशोर भदाडे याने सदर माल हा वाहन मालक २) नरसिंग राजेंद्र करडीले (रा. जानवळ, ता. चाकूर) याचा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून नरसिंग करडीले हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ९ लाख १२ हजार ४५० रुपये असून त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची किंमत २ लाख १२ हजार ४५० रुपये आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या इरटीगा कारची किंमत ७ लाख रुपये आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पथकामधील पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके,अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, आनंद हाल्लाळे, प्रवीण कोळसुरे यांनी केली आहे. अवैध गुटखा, तंबाखू व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis