मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रक चालक व क्लिनरचा मृत्यू
खोपोली एक्झिटजवळ दोन अवजड वाहने आणि कारची धडक; अनेक जखमी रायगड, 2 जून (हिं.स.) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या क्लिनरचा मृत्यू झाला, तर कंटेनर चालकासह कारमधील काही प्रव
Fatal accident on Mumbai-Pune Expressway; Truck driver and cleaner killed


खोपोली एक्झिटजवळ दोन अवजड वाहने आणि कारची धडक; अनेक जखमी

रायगड, 2 जून (हिं.स.) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या क्लिनरचा मृत्यू झाला, तर कंटेनर चालकासह कारमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात दोन अवजड वाहने आणि एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4.10 वाजण्याच्या सुमारास ढेकू गाव हद्दीतील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या किलोमीटर 36/700 या ठिकाणी हा अपघात घडला. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील रहिवासी असलेला ट्रक चालक ट्रक (एपी 39 टीझेड 1349) घेऊन जात असताना वाहनावरील नियंत्रण गमावल्याने समोरील कंटेनर-ट्रेलर (जीटी 29 एडब्ल्यू 4423) च्या मागील भागावर जोरदार धडक दिली.

प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

धडकेनंतर ट्रक रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीवर घासत जाऊन पलटी झाला. तर कंटेनर-ट्रेलरही रस्त्यावर उलटला. यानंतर पलटी झालेल्या ट्रेलरची धडक खारघर येथील एका कुटुंबाच्या इर्टिगा कारला (एमएच 31 जीए 5203) बसली.

या भीषण अपघातात ट्रक चालक आणि त्याचा क्लिनर गंभीर जखमी झाले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच कंटेनर चालक, इर्टिगा कारमधील एक वृद्ध महिला आणि कार चालक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य राबविले.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 199/2026 नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 106(1), 281, 125(अ) आणि 125(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक फेंगडू करीत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande