
रायगड, 02 जून, (हिं.स.)। : खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील नढाळ गाव परिसरात उभ्या असलेल्या पाच मिनी बस ची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 23 लाख रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाल्याने वाहनमालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फेड्रल बँक, मुलुंड (मुंबई) यांच्याकडून लिलाव प्रक्रियेत पाच मिनी बसेस खरेदी केल्या होत्या. या बसेस नढाळ गाव हद्दीतील आण्णा फार्म हाऊसजवळील मोकळ्या जागेत उभ्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने या सर्व मिनी बसेस चोरून नेल्याचा आरोप आहे.
या चोरीतील वाहनांची एकूण किंमत सुमारे 23 लाख रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. प्रकरणी केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी तालुक्यातील पुल्लोकरण हाऊस येथील रहिवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 212/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बागुल करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)