
लातूर, 02 जून, (हिं.स.)। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्ह्यात एकाच वेळी कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील गुळमिश्रित फसफसते रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अण्णाभाऊ साठे चौक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत गजानन सदाशिव हेरकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह पकडण्यात आले. त्याच दिवशी याच परिसरात अलीम सत्तार शेख (रा. झिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर) याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले.
कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे छापा टाकला असता लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याचे शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन जप्त करण्यात आले, तर दुसऱ्या कारवाईत शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये साठवलेले रसायन जप्त करण्यात आले.
अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार (रा. शेळगाव, ता. चाकूर) याच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून भिंगरी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे गंगाराम रोहिदास माने (रा. वडगाव एक्की, ता. चाकूर) याच्याविरुद्धही अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली असून देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ करण्यात आलेल्या कारवाईत शेख सलीम महेबुब (रा. नवी आबादी, जळकोट) याला देशी दारूच्या २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी कोणताही वैध परवाना नसताना देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती व समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis