सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना अटक; पिस्तूल, काडतुसे आणि तलवारी जप्त
अमरावती, 2 जून (हिं.स.) : गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयित आरोपींना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन तलवारी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आल
गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवारीसह तिघांना अटक


अमरावती, 2 जून (हिं.स.) : गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयित आरोपींना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन तलवारी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून एकूण 1.56 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांना एका सुझुकी ऍक्सेस मोपेडवर तीन तरुण संशयास्पद हालचाली करत फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री परिसरात सापळा रचला.

काही वेळातच संशयितांची मोपेड तेथून जाताना दिसताच पोलिसांनी वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालून तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या जवळ घातक शस्त्रे आढळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंश दीपक साहू (20, रा. अंजनगाव सुर्जी) याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत सुमारे 20 हजार 600 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

तसेच अनिल मदन सोळंके (23, रा. विलासनगर, अमरावती) याच्याकडून एक लोखंडी तलवार, तर अल्केश दीपक पवार (21, रा. आठवडी बाजार, परतवाडा) याच्याकडून आणखी एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.

याशिवाय आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी अॅक्सेस (एमएच-27 ईए-8077) ही दुचाकीही ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांसह वाहनाचा समावेश असलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 56 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

पोलिसांनी तिघांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande